भाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर

0
1286

जालना, दि. ९ (पीसीबी) – मित्र पक्ष भाजपने शिवसेनेची वाट लावण्याचे कारस्थान सुरू केले आहे. याला मित्र म्हणावे का वैरी?  असा सवाल करून मागच्या वेळी युतीमुळे आम्ही भाजपच्या उमेदवारांसाठी टेबल लावले होते, मात्र, आता त्यांची वाट लावणार, असा  इशारा  शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नांव न घेता दिला.

बदनापूर येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात खोतकर यांनी पुन्हा एकदा जालना लोकसभा लढवणार असल्याचा पुनरूच्चार केला.

राज्यात युतीचे सरकार आहे, मात्र, शिवसेनेच्या दोन-तीन मंत्र्यांना सोडले तर इतर मंत्र्यांना फारसे अधिकार ठेवलेले नाहीत. त्यामुळे आता भाजपशी युती नको, झालीच तर जालन्याची जागा सोडू नका, मैत्रीपूर्ण का होत नाही, पण एकदा होऊनच जाऊ द्या, असे आपण शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना सांगितले आहे,  असे खोतकर यांनी सांगितले.

दरम्यान, अर्जून खोतकर  जालना लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवणार असल्याची चर्चा जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याबाबत या मेळाव्यात एका कार्यकर्त्याने अर्जून खोतकर यांना विचारले असता खोतकर म्हणाले की, आपल्याला लोकसभा लढवण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच सांगितले आहे, असा खुलासा  त्यांनी यावेळी केला.