भाजपला महाराष्ट्रात स्थान बाळासाहेबांनीच दिलं : देवेगौडा

0
805

बेंगळुरू,दि.११(पीसीबी): माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे व काँग्रेसलाही महत्त्वाचा असा सल्ला दिला आहे.महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेऊन काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तर पुढची पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न राहायला हवा. सरकार अस्थिर होईल, असे कोणतेही पाऊल काँग्रेसकडून उचलले जाऊ नये. काँग्रेसला पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करायचा असेल तर त्यांनी तसं वागायला हवं, असा सल्ला देवेगौडा यांनी दिला.

देशात सर्वाधिक काळ टिकलेली भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची युती आता जवळपास संपुष्टात आल्याचे दिसत आहे. युती तुटल्याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी आज राजीनामा दिल्याने त्यासोबतच शिवसेनेने भाजपसोबतचे राज्यातले आणि केंद्रातले नाते तोडल्याचे स्पष्ट झाले आहे.

सावंत यांच्या राजीनाम्यामुळे आता शिवसेना एडीएचा घटक नसेल, हे ही स्पष्टच आहे. या पार्श्वभूमीवर देवेगौडा यांच्या विधानाला महत्त्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीच भाजपला महाराष्ट्रात स्थान दिल्याची आठवण देवेगौडा यांनी करून दिली आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते तेव्हा बाळासाहेबांच्या घरी युतीचा प्रस्ताव घेऊन गेले होते. काही जागा भाजपला सोडाव्या, अशी विनंती त्यांनी केली होती. त्यातूनच शिवसेना-भाजप युती झाली होती. मात्र भाजपला आज त्याचा विसर पडला आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी भाजपला धडा शिकवण्यासाठी टोकाचे पाऊल उचलले आहे, असे देवेगौडा यांनी नमूद केले.