Maharashtra

भाजपला मदत करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार

By PCB Author

September 21, 2018

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात दोन निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. तिथे शरद पवार प्रचाराला गेले नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ते धर्मनिरपेक्ष आहेत असे तेव्हा वाटत होते, आता वाटत नाहीत”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला.

दरम्यान, पवार धर्मनिरपेक्ष आहेत पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्याला पवारांनी उत्तर दिले. याशिवाय पवारांनी एका निवडणुकीची आठवणही सांगितली.

“मला साल आठवत नाही, पण ईशान्य मुंबईत आम्ही उभ्या केलेल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आंबेडकरांच्या पक्षाने नीलम गोऱ्हेंना उभं केले होते. त्याचा लाभ प्रमोद महाजन यांना झाला होता. महाजन तेव्हा भाजपात होते. तेव्हा भाजपाला लाभ पोहोचवण्यासाठी उमेदवार उभे करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक इतरांना कोण धर्मनिरपेक्ष आहे आणि कोण नाही हे सांगतात”, असा हल्ला पवारांनी चढवला.