भाजपला पूर्ण बहुमत मिळणे कठीण – शरद पवार

0
596

अलिबाग, दि. २० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असे वाटत नाही, देशातील प्रादेशिक राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर भाजपसाठी २०१४ सारखी परिस्थिती राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते अलिबाग येथे शेतकरी भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या पाच वर्षांत प्रादेशिक पातळीवरील राजकीय परिस्थिती बदलली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकत्र आले आहेत. चंद्राबाबू नायडू एनडीएच्या सोबत नाहीत. जयललिता यांच्या पश्चात तामिळनाडूमध्ये एडीएमकेमध्ये गटातटाचे राजकारण सुरू आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. कर्नाटकमधील परिस्थिती भाजपसाठी आश्वासक नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असे वाटत नाही असेही ते म्हणाले.

गेल्या पाच वर्षांत कृषी उत्पन्नात घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आद्योगिक उत्पादनही घसरले आहे. जीडीपी दरही घटला आहे. बेरोजगारी वाढली आहे. शासनाचा अहवालच हे सांगत आहे हे नरेंद्र मोदी सरकारच्या यशाचे गमक असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या माझ्यावर टीका करत आहेत. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. माझ्यावर टीका केल्याने त्यांच्या पक्षाला फायदा होईल असे त्यांना वाटत असेल त्यामुळे ते कदाचित माझ्यावर बोलत असतील. पक्षाचा उमेदवार नसतानाही राज ठाकरे सध्या प्रचार सभा घेत आहेत. त्यामागे त्यांचा विशिष्ट हेतू आहे. त्यांच्या या प्रचार सभांचा तरुण मतदारांवर परिणाम होईल, असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील उपस्थित होते.