भाजपला धक्का; संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

0
765

पिंपरी,दि.२४(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला आणखी एक धक्का देत वृक्ष प्राधिकरण समितीचे सभासद संभाजी बारणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्योजक अभय मांढरे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, नगरसेवक विनोद नढे आदी उपस्थित होते.

थेरगाव परिसरातून संभाजी बारणे यांनी २०१७ मध्ये निवडणूक लढवली आहे. अवघ्या ४०० मतांच्या फरकाने बारणे यांना निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला होता. पिंपरी-चिंचवड महापालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या सदस्यपदी बारणे यांनी काम केले आहे.

याबाबत अभय मांढरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या कारभाराला कंटाळून अनेकजन राष्ट्रवादीत येणार आहेत. अद्याप ९ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. तसेच, सभागृहातील बडा नेता अजितदादांच्या संपर्कात असून, लवकरच प्रवेश होईल, असा दावाही मांढरे यांनी केला आहे.