“भाजपला ‘गजनी’सारखा झटका येतो आणि अमित शाह हे गजनी आहेत”

0
213

रायगड, दि.२७ (पीसीबी) : शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपला ‘गजनी’सारखा झटका येतो आणि अमित शाह हे गजनी आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले. ते रायगडमध्ये बोलत होते. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी रायगडमध्येच बोलताना काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. मात्र आता अरविंद सावंत यांनी अमित शाहांवरच निशाणा साधल्यामुळे, शिवसेना-भाजप युतीबाबत सुरु असलेल्या चर्चा पुन्हा थांबल्या.

माथेरान नगरपरिषदेतील कर्मचारी वर्गाने शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेच्या कामगार युनियनमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला अरविंद सावंत हजर होते. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ‘मैने ऐसे कोई बोला नही था’, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी असेल, पण उद्धवजी मात्र रामशास्त्री बाण्याचं काम करणारे आमचे नेतृत्व आहे हे लक्षात ठेवा, असं अरविंद सावंत म्हणाले. शिवसेना-भाजपच्या युतीबाबत काय घडलं होतं, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, असा रोख अरविंद सावंत यांचा होता.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित होते. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित होते. तब्बल साडेतीन तास ही बैठक चालली. या बैठकीत नक्षली कारवाया रोखण्यापासून ते नक्षली भागात करावयाच्या उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भोजन घेतलं.