भाजपलाच मतदान करा, मोदींनी मतदान केंद्रात कॅमेरे बसवलेत – भाजप आमदार

0
459

दाहोद, दि. १७ (पीसीबी) – तुम्ही मत कुणाला दिले?  हे लगेच समजणार, कारण  मतदान केंद्रात मोदी यांनी कॅमेरे  बसवलेले आहेत. भाजप आणि काँग्रेसला कोणी मतदान केले, यावर  कॅमेऱ्यांची नजर असेल,  असे विधान करून भाजप आमदार रमेश कटारा यांनी मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.

गुजरातच्या दाहोदमध्ये  एका  सभेत  रमेश कटारा थेट मतदारांना  धमकी देत असल्याचा प्रकार समोर आला आहे.  या सभेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या सभेत बोलताना कटारा म्हणाले की, ईव्हीएमवर दाहोद मतदारसंघातील भाजप उमेदवार जसवंत भाभोर यांचा फोटो आहे. त्यासमोर कमळाचे चिन्ह आहे, ते पाहूनच बटन दाबा. कुठेही चूक होता कामा नये. कारण मोदींनी मतदान केंद्रांवर कॅमेरे बसवले आहेत. भाजपला कुणी मत दिले नाही हे कळेल आणि त्यानंतर तुम्हाला काम मिळणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कटारा यांना नोटीस बजावून  २४ तासांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तर माझे विधान चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने कॅमेरे बसवले आहेत. त्याविषयी मी माहिती दिली आणि केंद्रांवर गोंधळ घालू नये, असे आवाहन  मतदारांना केल्याचे  कटारा म्हणाले.