भाजपने राष्ट्रवादीला शिवसेनेसह सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

0
549

मुंबई, दि. २९ (पीसीबी) –  युती सरकारमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसला  शिवसेनेसह सहभागी होण्याचा  प्रस्ताव   भाजपने दिला होता, असा गौप्यस्फोट  भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.  मात्र,  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र हा  प्रस्ताव फेटाळून लावला होता.  पवारांनी शिवसेनेला सत्तेत  सहभागी करून घेण्यास विरोध दर्शवला होता. मात्र, भाजपलाही शिवसेनेला दुखावून बाहेर काढायचे नव्हते, असेही  त्या नेत्याने सांगितले.

राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली आहे. या प्रकरणात मोदींच्या हेतू विषयी शंका घेतली जाऊ शकत नाही, त्यांचा या प्रकरणाशी वैयक्तिक संबंध नाही, अशी क्लिन चीट पवारांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याने  केलेला गौप्यस्फोट  महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

ज्यावेळी शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचे इशारे भाजपला देत होती. त्यावेळी राष्ट्रवादीला ५ ते ६ मंत्रिपदे देऊन सत्तेत सहभागी करून घ्या, अशा सुचना भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिल्या होत्या. तसेच शिवसेनेला स्वत:हून बाहेर काढायचे नाही, अशाही सुचना दिल्या होत्या. त्यानुसार  अनेक गोष्टी अंतिम टप्प्यातही आल्या होत्या. मात्र,  शिवसेना  सत्तेतून   बाहेर पडण्याचे नांवही घेत नव्हती, असेही या नेत्याने सांगितले.