भाजपने मोठा ‘गेम’ खेळलाय; शत्रुघ्न सिन्हांना संशय

0
512

बिहार, दि. २४ (पीसीबी) – ‘निवडणुकीचे निकाल पाहता यावेळी काहीतरी मोठा ‘गेम’ खेळला गेलाय,’ असा संशय काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. बिहारमधील पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवचा धक्का सहन करावा लागला आहे.

पराभवानंतर मीडियाशी बोलताना सिन्हा यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘या निवडणुकीत काहीतरी मोठा गेम खेळला गेलाय. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांचे निकाल पाहता इथे मोठ्या प्रमाणात नक्कीच काहीतरी गेम झाला आहे. अर्थाक, हे सगळे बोलण्यासाठी ही वेळ योग्य नाही,’ असेही ते म्हणाले. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपला पराभव स्वीकारत सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. ‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांचे मी अभिनंदन करतो. हे दोघेही उत्तम रणनीतीकार आहेत. माझे जुने मित्र रविशंकर प्रसाद यांना देखील शुभेच्छा देतो. पाटणा आता ‘स्मार्ट सिटी’ बनेल अशी आशा करतो,’ असे म्हणत शत्रुघ्न यांनी त्यांना मते देणाऱ्या मतदारांचेही आभार मानले आहेत.