Maharashtra

भाजपने ‘त्या’ वॉशिंग पावडरचे नाव सांगावे- सुप्रिया सुळे

By PCB Author

August 23, 2019

अहमदनगर, दि. २३ (पीसीबी)- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असताना वाईट असणारे लोक भाजपमध्ये आल्यावर स्वच्छ कसे ठरतात?, त्यासाठी कोणती वॉशिंग पावडर वापरली जाते?, भाजपने त्या पावडरचे नाव सांगावे,’ असा तिरकस टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हाणला आहे.

संवाद यात्रेनिमित्त सुळे आज नगरमध्ये होत्या. तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपच्या पळवापळवीच्या राजकारणावर तोफ डागली. ‘आमचे बरेच लोक तिकडे गेले असल्याने सत्ता कोणाचीही आली तरी आमचे लोकच सत्तेत असतील, असे त्या म्हणाल्या. वाढती बेरोगजारी व आर्थिक मंदीमुळे सर्वसामान्य माणूस भरडला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

३७० कलम हटवण्याच्या पद्धतीला आमचा विरोध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ‘देशात ११ राज्ये अशी आहेत, जिथे बाहेरच्या व्यक्तीला जमीन विकत घेता येत नाही. इतकेच काय, मोदी सरकारने नागालँडसाठी स्वतंत्र घटना करण्यास मान्यता दिली आहे,’ असा खळबळजनक दावाही सुळे यांनी केला.