Pune

“भाजपने ज्योतिषी बदलावा. आघाडीचं सरकार आल्यापासून भाकीतं केली जाताहेत पण…”

By PCB Author

October 02, 2021

पुणे, दि.०२ (पीसीबी) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजपचं सरकार येणार असल्याचं भाकीत केलं आहे. त्यांच्या या भाकितावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. आघाडीचं सरकार आल्यापासून भाकीतं केली जात आहेत. आता भाजपने ज्योतिषी बदलावा, असा खोचक टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपकडून भाकीतं केली जातायत. मात्र आता त्यांना ज्योतिषी बदलण्याची गरज आहे, असं थोरात म्हणाले. मराठावाडा विदर्भात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या भागांची पाहणी करणार आहेत. त्यावरही थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख मराठवाड्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांना मदत करणं हे महत्त्वाचं आहे. त्याला ओला दुष्काळ नाव द्यायचं की अजून काही हा नंतरचा विषय आहे. शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं हे पाहावं लागेल. मोजदाद केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही. येत्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होऊन निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.

आज नितीन गडकरी आणि शरद पवार यांची भेट होत आहे. त्यावर ते म्हणाले की, नितीन गडकरी आणि शरद पवारांची भेट होऊ शकते. नितीन गडकरी यांना आम्ही राजकारणापलिकडे बघतो. राजकारण आणि विकास हे वेगवेगळ ठेवलं पाहिजे. दैनिक ‘सामाना’तील अग्रलेखावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेस हा एक विचार आहे. मला खात्री आहे काँग्रेस पुन्हा उभी राहील. हे तुम्हाला लवकरच दिसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांना पंतप्रधान करायचं आहे. तर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे अजितदादांना पुण्यात अडकवून ठेवू नका असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राजकारणात महत्वाकांक्षी असणं गरजेचं आहे. आमचा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता अशी महत्वकांक्षा ठेवू शकतो त्यात गैर काय?, असा प्रतिसवाल त्यांनी केला.