‘भाजपने किरीट सोमय्या यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं’

0
218

नवी दिल्ली, दि.१५ (पीसीबी) : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीतील नेत्यांना टार्गेट करून त्यांचे भ्रष्टाचार काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोमय्या यांना टोला लगावला आहे. भाजपने किरीट सोमय्या यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं, असा चिमटा रोहित पवार यांनी काढला आहे.

रोहित पवार दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कर्जत-जामखेडमधील विकास कामांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी मनमोकळ्या गप्पा मारत विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. सोमय्यांना भाजपने एक ऑफिशियल पोस्ट द्यावी. ईडीचे प्रवक्ते अशी काही तरी पोस्ट त्यांना द्यावी. आता त्यांच्याकडे एक प्रतिनिधी एवढंच पद आहे. त्यांना प्रवक्ते केले तर ते ईडीचे प्रतिनिधी आहेत हे ऑफिशियल होऊन जाईल. ईडींना कळायच्या आधी त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात. त्यांच्यावर टीव्हीचा फोकसही असतो, त्यामुळे त्यांना हे पद द्यायला हरकत नाही, असा टोला पवार यांनी लगावला.

यावेळी त्यांनी ईडीच्या गैरवापरावरही टीकास्त्र सोडलं. ईडी किंवा सीबीआयचा राजकीय वापर होत असेल तर घातक आहे. नाही तर तो पायंडा पडतो. एखाद्या राजकीय नेत्याला दाबायचं असेल तर अशाच यंत्रणाचा वापर केला पाहिजे असं संबंधितांना वाटतं. लोक घाबरतात. कारण त्यात तथ्य नसलं तरी त्या प्रक्रियने त्रास होतो. कुटुंबावर परिणाम होतो. त्यातून काहीच बाहेर येत नाही. सुशांतसिंह प्रकरणात असंच केलं. बिहारच्या निवडणुकीसाठी यंत्रणांचा वापर केला आणि त्यातून बाहेर काय आलं तर आत्महत्याच असल्याचं निष्पन्न झालं. अशा गोष्टीतून राजकीय मनस्तापच होतो. ते थांबलं पाहिजे. बोलायचं तर मूलभूत मुद्दयावर बोलू. राज्य सरकार चुकत असेल तर त्यावर बोलू. याचा दहावा नंबर त्याचा बारावा नंबर यामध्ये गुंतून राहिला तर ईडीवर लोकांचा विश्वास राहणार नाही, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपच्या ओबीसी आरक्षण आंदोलनावरही टीका केली. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यात आपले चार महिने जाणार आहेत. पण ती माहिती इम्पिरिकल डेटा हा केंद्राकडे आहे. ती जर केंद्राने दिली तर भाजपवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. भाजपचे खासदार संसदेत मराठा आरक्षणावर बोलले नाही. सर्वांनी मिळून एकच मुद्दा घ्यायला हवा होता तो म्हणजे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा. पण या मुद्द्यावर भाजपचे खासदार संसदेत मूग गिळून बसले होते. आता भाजप सध्या जे करत आहे ते केवळ राजकारण आहे. आताच संसदेत हा मुद्दा मार्गी लावायला हवा होता. भाजपच्या एकाही व्यक्तीने हा मुद्दा मांडला नाही. हे दुर्देव आहे, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. महिलांच्या विरोधात किंवा त्यांच्याबाबतीत कुणीही बोलत नाही. पण आपल्याकडे काही लोक बोलत आहे. प्रसिद्धीसाठी काही गोष्टी केल्या जात आहेत. पण कोणत्या मुद्द्यावर आपल्याला प्रसिद्धी मिळते हे पाहिलं पाहिजे. धोरणात्मक विषयावर बोललं पाहिजे. तरुणांच्या हाताला रोजगार दिला पाहिजे. काम दिलं पाहिजे. आजची ही गरज आहे. राजकारण्यांनी त्यावर भर दिला पाहिजे, असं ते म्हणाले.