Maharashtra

भाजपने आरक्षण देऊन मराठा, ओबीसी समाजामध्ये भांडणे लावली – प्रकाश आंबेडकर

By PCB Author

December 22, 2018

अहमदनगर, दि. २२ (पीसीबी) – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मराठा समाजाला आरक्षण देऊन आपला राजकीय स्वार्थ साधला आहे. मात्र त्यातून मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडणे लागली आहेत, संघर्ष निर्माण होणार आहे, असे भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष  अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी  म्हटले आहे.

अहमदनगरमध्ये  ‘मातंग समाज सत्ता संपादन एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी   आंबेडकर  आले होते.  ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी आंबेडकर म्हणाले की, मंडल आयोगाने ज्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर ओबीसींना आरक्षण दिले, तेच मराठा समाजाला लागू केले आहे. यामुळे ओबीसींमध्ये आमच्या ताटात वाटेकरी निर्माण झाल्याची भीतीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे शांत असलेल्या महाराष्ट्रात आता संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आरक्षणातून निर्माण झालेली ही कटुता निवडणुकीतून बाहेर पडेल, असे ते म्हणाले.

मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल की नाही, याबद्दल आपण साशंक आहोत, असे सांगून राज्यात ७० टक्के आरक्षण लागू केल्यास मराठा समाजाचे आरक्षण टिकेल, असा प्रस्ताव आपण मुख्यमंत्र्यांना दिला होता, मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही, असे आंबेडकर म्हणाले.