Maharashtra

भाजपच राष्ट्रीय आपत्ती; सत्तेतून हद्दपार करा – शरद पवार  

By PCB Author

November 13, 2018

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – शेती व्यवसाय संकटात आला असून शेतकऱ्यांच्या  आत्महत्या वाढत आहेत.  याबाबत  केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना सोयरसुतक नाही. दुष्काळावर चर्चा सुरु असताना भाजप राम मंदिराचा मुद्दा काढून समाजात दुषित वातावारण तयार  करत आहे.  घटनात्मक संस्थांवर हल्ले  चढवून त्या दुबळ्या  केल्या जात आहेत. त्यामुळे भाजपच राष्ट्रीय आपत्ती  झाली आहे. त्यासाठी भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  केली.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते. येत्या निवडणुकीत प्रतिगामी भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व पुरोगामी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी  केले.

दरम्यान, या परिषदेच्या निमित्तीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते एका व्यासपीठावर आले. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपविरोधी महाआघाडी करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळण्याची शक्यता आहे. येत्या २९ व ३० नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च दिल्लीत काढण्यात येईल, असे या वेळी जाहीर करण्यात आले.