Maharashtra

भाजपच्या वेबसाईटवर खासदर रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख; अनिल देशमुख यांचा कारवाईचा इशारा

By PCB Author

January 28, 2021

मुंबई, दि.२८ (पीसीबी) : भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला ट्वीट करत तत्काळ कार्यवाही करा, अन्यथा सायबर सेल पुढील कारवाई करेल असं सांगितलं आहे.

BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे. या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख दिसत नाहीये. तो आक्षेपर्ह उल्लेख तत्काळ हटवण्यात आला आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. जेव्हा रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, स्वाती चतुर्वेदी यांनी ट्वीट केल्यानंतर लगेचच या प्रकरणाची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. त्याचप्रमाणे रक्षा खडसे यांनी एबीपी माझाला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी सर्व प्रकारासंदर्भात पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केल्याचं म्हटलं आहे. तसेच हा सर्व प्रकार माझी बदनामी करण्यासाठीही कोणीतरी फोटोशॉप करुन केलेला असावा, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. @BJP4India आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा @MahaCyber1 पुढील कारवाई करेल.

— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 27, 2021

गृहमंत्री अनिल देशमुख यांचं ट्वीट : गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, “भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसेजी यांचं अपमानजनक वर्णन पाहून धक्का बसला. अशाप्रकारे महिलांचा अपमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपनं दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करेल.”