Desh

 भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी जे.पी. नड्डा यांची नियुक्ती

By PCB Author

June 18, 2019

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – भाजप अध्यक्ष अमित शहा यांची  गृहमंत्रिपदी निवड झाल्याने त्यांच्यावरील पक्षाध्यक्ष पदाचा कार्यभार हलका करण्यासाठी  भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी  जे.पी. नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय बैठकीत भाजपचे जेष्ठ नेते जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

नड्डा भाजप पक्षाच्या दैनंदिन कामकाजाची धुरा सांभाळतील. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाच राहणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशामध्ये भाजपाने मिळवलेल्या यशामध्ये जे. पी. नड्डा यांचा मोलाचा वाटा आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने ८० पैकी तब्बल ६२ जागा जिंकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षाची मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

दरम्यान, अमित शहांच्या यांची गृहमंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर आपल्याकडील पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी इतर व्यक्तीकडे सोपवावी, असे शहा यांनी सांगितले होते. त्यानुसार पक्षाच्या संसदीय मंडळाने जे.पी. नड्डा यांची नियुक्ती पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी  केली, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.