Banner News

भाजपच्या करेक्ट कार्यक्रमाला अजित पवारांकडून सुरुवात; ‘या’ भाजप नगरसेविकेच्या पतीचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

By PCB Author

September 09, 2021

पिंपरी, दि.०९ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घंटा वाजताच सत्ताधारी भाजपमध्ये गोंधळाच वातावरण निर्माण झाल आहे. कारण, थेरगावातील भाजपच्या जेष्ठ नगरसेविका माया बारणे यांचे पती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी आज गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, अभय मांढरे यावेळी उपस्थित होते. बारणे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संतोष बारणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या पत्नी माया बारणे थेरगावातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. 2012 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर 2017 मध्ये भाजपच्या कमळावर त्या सलग दुसऱ्यावेळी निवडून आल्या आहेत. थेरगावात त्यांचे वर्चस्व आहे. त्यांचे पती संतोष बारणे यांनी आज पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

वृत्त वाहिनीशी बोलताना अभय मांढरे म्हणाले की, “माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत. स्वकर्तुत्वाने ते चारवेळा महापालिकेवर निवडून आले आहेत. थेरगाव भागात त्यांची मोठी ताकद असून भाजपला हा मोठा धक्का आहे. भाजपच्या कारभाराला वैतागून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणखी नऊ नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. हळूहळू सर्वांचे प्रवेश होतील. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत काय होणार, कोणाची सत्ता येणार याचे चित्र स्पष्ट होत आहे”.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपच्या पिंपळेगुरव प्रभाग क्रमांक 29 च्या नगरसेविका, महिला व बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांचे पती आणि माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला गळती सुरू झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवडवर भर दिल्याचे या दोनही पक्ष प्रवेशावरून दिसून येत आहे.