“भाजपचे लोक एनसीबीचे प्रवक्ते आहेत का?”

0
277

मुंबई, दि.०८ (पीसीबी) : भाजपचे लोक एनसीबीचे प्रवक्ते आहेत का? त्यांचा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंध काय? असा सवाल करतानाच राजकारण्यांनी अशा प्रकरणात हस्तक्षेप करू नये. यंत्रणांना त्यांचं काम करू द्यावं, असं आवाहन मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. अस्लम शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला आहे. ही केस एनसीबीची आहे. राज्य सरकार आणि जे लोक अटक झाले त्यांची ही केस आहे. यात भाजपच्या लोकांनी का उडी घेतली? भाजपचा या ड्रग्ज प्रकरणाशी काय संबंध आहे? ते एनसीबीचे प्रवक्ते आहेत का? एनसीबीचे अधिकारी सक्षम आहेत. ते उत्तरे देतील. हे चुकीचं होत आहे… ते चुकीचं होत आहे… हे ते का सांगत आहेत? मला वाटतं अशा प्रकरणात कोणत्याही राजकीय पक्षांनी हस्तक्षेप करू नये. त्यांनी एजन्सीला काम करू द्यावे, असं आवाहन अस्लम शेख यांनी केलं. काशिफ खानला मी ओळखत नाही. त्याच्याशी माझं फोनवर संभाषण झालेलं नाही. त्याने मला भेटून कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. त्यापूर्वी आणि त्यानंतर मी त्याला कधीच भेटलो नव्हतो, असं सांगतानाच मला रोज पाच पन्नास लोक अनेक कार्यक्रमाचं निमंत्रण देत असतात. लोक मला भेटत असतात. अनेकांचे निमंत्रण येतं. मात्र, ज्या कार्यक्रमाला हजर राहायचे असेल त्याच कार्यक्रमाची माहिती मी घेत असतो. ज्या कार्यक्रमाला जायचं नाही, त्याची माहिती घेत नाही. जिथे जायचंच नाही, त्याची माहिती घेणं चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हजारो लोकांशी मला बोलावं लागतं. त्यामुळे काशिफशी बोलणं झालं असं वाटत नाही. क्रुझला परवानगी देण्याचं काम आमचं नाही. राज्य सरकारचं नाही. आमच्या विभागाने क्रुझला परवानगी दिली नव्हती. क्रुझ चालू नये आणि क्रुझ टुरिझम बंद व्हावं असं वाटत नाही. लोक पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे हे टुरिझम राहिलं पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुशांत सिंग आणि दिशा सालियनप्रकरणातही मुंबईच्या पालकमंत्र्याचं नाव अनेक ठिकाणी घेतलं. भाजपच्या नेत्यांनी त्यांचं नाव प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चालवण्याचं काम केलं. पण कुठपर्यंत ही केस चालली? कुठपर्यंत मीडियाने हे प्रकरण चालवलं? बिहारची निवडणूक होईपर्यंत हे प्रकरण चालवलं गेलं. बिहारची निवडणूक खतम, सुशांत सिंग प्रकरण खतम. कोणत्याही मीडियाने कोणत्या संपादकाने त्यानंतर चुकीबद्दल माफी मागितली का? एजन्सीने सुशांतचा खून झाला असं म्हटलं नाही. तपासातही तसं आढळून आलं नाही. मात्र अनेक चॅनेलच्या हेडने तर खून झाल्याचं सांगितलं. त्यांनी माफी मागितली का? असा सवालही त्यांनी केला.

आधी सर्वांनी शाहरुख खानचा मुलगा ड्रग्ज केसमध्ये सापडल्याची आधी बातमी आली. त्याच्या पुढची बातमी आली की त्याच्याकडे काहीच सापडलं नाही. त्याने ड्रग्ज घेतलं नाही. त्यानंतर व्हॉट्सअॅप चॅटचा मुद्दा आला. व्हॉट्सअॅपच्या हिशोबाने जर चाललो तर या देशातील 80 टक्के लोक आज जेलमध्ये असतील. व्हॉट्सअॅप चॅटला कोर्ट मान्य करत नाही. मंत्र्यांपासून सामान्य माणसांपर्यंतच्या चॅटमध्ये मस्ती मजाक असते. व्हिडीओ असतात. आता जर मोबाईल पाहिले तर किती लोकांच्या मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे व्हिडिओ असतील. ते व्हिडीओ काय असतील हे सांगायची गरज नाही. या पार्श्वभूमीवर जर लोकांना अटक करू लागलो तर तुरुंग कमी पडतील, असं ते म्हणाले.