भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द; त्यांना दिलेले मानधनही महापालिका वसूल करणार

0
1280

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द करण्यात आले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी (दि. ६) गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. महापालिकेत ७७ नगरसेवकांसह भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. त्यांना अपक्ष चार नगरसेवकांचाही पाठिंबा आहे. गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांची संख्या आता ८० होणार आहे. गायकवाड यांचे पद रद्द झाल्याने प्रभाग क्रमांक १ चिखली अ जागेवर पुढील महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

कुंदन गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक एक, चिखलीमधील अ जागेवर भाजपकडून निवडणूक लढविली होती. ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. निवडणुकीत गायकवाड हे विजयी झाले. राखीव जागेवर विजयी झालेल्या नगरसेवकांना निवडणुकीनंतर सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. गायकवाड यांनी बुलडाणा जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे आपल्याला जात पडताळणी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र समितीने गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र दोनवेळा अवैध ठरवत ते अनुसूचित जातीत मोडत नसल्याचा निकाल दिला आहे.

कुंदन गायकवाड हे कैकाडी समाजाचे असून, ही जात विमुक्त जातीमध्ये मोडत असल्याचे बुलडाणा जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने स्पष्ट केले आहे. त्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कळविल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या आदेशावर शनिवारी स्वाक्षरी केली. तसेच गायकवाड यांना आतापर्यंत दिलेले मानधन वसूल करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक एक चिखलीमधील अ जागेवर येत्या पुढच्याच महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे ७७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये चार अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द झाले तरी महापालिकेतील भाजपची सत्ता अबाधीत राहणार आहे. आता पोटनिवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.