भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

0
377

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार तग धरुन राहणार असे जवळपास स्पष्ट झाल्याने आता भाजपमधील नाराज नेते पक्षांतराच्या मनस्थितीत आहेत. प्रामुख्याने माजी मंत्री व जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वारंवार आपली नाराजी प्रगट केली असून आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे जोरदार चर्चा आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई राष्ट्रवादी कार्यालयात एक विशेष बैठक सद्या सुरू असून या विषयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक भाजप नेते इच्छुक असल्याचे राष्ट्रवादीतून सांगण्यात आले. युती सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना प्रथम मंत्रीमंडळातून राजीनामा देणे भाग पाडले. भोसरी येथील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांच्याबाबात भाजमधूनच बदनामीचे सत्र आरंभण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी भाजपमध्ये त्यांना डावलण्या आले. राज्यसभा, विधान परिषद अशा दोन्ही निवडणुकीत खडसे यांना संधी मिळणार अशी शक्यता असताना त्यांना बाजुला ठेवण्यात आले. आपली नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखविली, पण त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता त्यांचे पक्षांतर निश्चित असल्याचे बोलले जाते.

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना, भाजपला महाराष्ट्रात मोठे करण्यात संघटनेच्या बांधनीत आमचे सर्वांचे जेष्ठनेते एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे, ते कदापी पक्षांतर करणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे.