भाजपची डोकेदुखी वाढणार! चिराग पासवान यांचं अमित शाह यांना पत्र; विरोधात उमेदवार देण्याचे संकेत

0
272

नवी दिल्ली,दि.२८(पीसीबी) – बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी जागा वाटपासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच पत्र लिहिलं आहे. अपेक्षित जागा न मिळाल्यास जदयू विरोधात उमेदवार देण्याचे संकेत पासवान यांनी दिले आहेत.

‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्यानं एनडीएतील जागावाटपासंदर्भातील वृत्त दिलं आहे. लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली होती. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याविरोधी वातावरण असल्याचं चिराग पासवान यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

दरम्यान पुन्हा एकदा चिराग पासवान यांनी जागा वाटपाचा मुद्दा उपस्थित करत अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. चिराग पासवान यांनी ३३ जागांची मागणी केल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. त्याबरोबरच राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या जागांपैकी २ जागांचीही मागणी केली आहे. अपेक्षित जागां न मिळाल्यास मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूविरोधात उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत.