भाजपचा युतीबाबत कोणताही अल्टीमेटम आलेला नाही; शिवसेनेचे स्पष्टीकरण   

0
486

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – युतीचा निर्णय लवकर घ्या, अन्यथा लोकसभा आणि विधानसभा  निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्यास तयार रहा, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिल्याची माहिती समोर आली होती. यावर असा कोणताही अल्टीमेटम भाजपकडून देण्यात आलेला नाही, असे  शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी  भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेवर युती करण्याबाबत रणनिती आखल्याची महिती सूत्रांकडून मिळाली होती. याचा भाग म्हणून शिवसेनेला युती करण्याबाबत अल्टीमेटम दिल्याचे वृत्त समोर आले होते.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करायची किंवा नाही, याबाबत काही निर्णय घ्यायचा तो लवकर जाहीर करा, असा इशारा अमित शहा यांनी शिवसेनेला दिल्याचे समजते. हा इशारा देण्यामागे शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपची रणनीती असू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आता शिवसेना युती करण्याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, भाजपने शिवसेनेवर दाबावतंत्राचा वापर करण्यास सुरूवात केल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात सध्या भाजपच्या २२ तर, शिवसेनेच्या १८ जागा आहेत.