भाजपचा पराभव करण्यात अपयश आल्यास गुजरातमध्ये काँग्रेस एकही जागा जिंकू शकणार नाही

0
724

गांधीनगर, दि. १७ (पीसीबी) – गुजरातमधील आणंद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भारतसिंह सोळंकी यांनी भाजपाचा पराभव करणारच, असा दावा केला आहे. आणंदमध्ये भाजपाचा पराभव करण्यात अपयश आले तर गुजरातमध्ये काँग्रेस एकही जागा जिंकू शकणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाने सर्व जागांवर (२६ जागा) विजय मिळवत काँग्रेसला धूळ चारली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर चित्र बदलले असून काँग्रेसच्या गोटात उत्साह संचारला आहे. आणंद लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो. सोळंकी हे २००४ आणि २००९ मध्ये या मतदारसंघातून लोकसभेवर निवडूनही गेले होते. या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा १० वेळा विजय झाला आहे. पण २०१४ मधील निवडणुकीत भाजपाचे दिलीप पटेल यांनी काँग्रेसचा पराभव केला. यापूर्वी भाजपाने १९८९ आणि १९९९ मधील निवडणुकीतही या मतदारसंघात विजय मिळवला होता.

यंदाच्या निवडणुकीत दिलीप पटेल यांच्याविरोधातील नाराजी पाहता भाजपाने मितेश पटेल या व्यावसायिकाला उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून हा पारंपारिक मतदारसंघ परत मिळवण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे.

काँग्रेसचे उमेदवार भरतसिंह सोळंकी म्हणाले, मध्य गुजरातमधील आणंद मतदारसंघ हा काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. आता या मतदार संघात आमचा पराभव झाला तर आम्ही गुजरातमध्ये एकही जागा जिंकू शकणार नाही. आमचा विजय निश्चित आहे, असा दावाही त्यांनी केला. पक्षातील जबाबदारीमुळे मतदारसंघातील लोकांशी माझा संपर्क कमी झाला. पण आता मी पुन्हा लोकांपर्यंत पोहोचत आहे. जनतेचा भाजपा सरकारवर विश्वास नाही आणि यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी नमूद केले.