Maharashtra

भागवताचार्य वा.ना. उत्पात यांचे निधन

By PCB Author

September 29, 2020

 

पुणे, दि. २९ (पीसीबी) : संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आपल्या रसाळ वाणीने संपूर्ण महाराष्टाला भागवत कथेने मंत्रमुग्ध करणारे भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा.ना. उत्पात यांचे कोरोनामुळे पुण्यात उपचारादरम्यान सोमवारी (28 सप्टेंबर) निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात चार मुली, एक मुलगा, सून,नातवंडे असा परिवार आहे. वा.ना. उत्पात हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला तसेच सावरकर साहित्याचा प्रसार केला. त्यांनी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. कै. वा.ना. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण आणि आध्यात्मक्षेत्रातील प्रमुख नाव असून त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषवले होते. ते येथील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. आयुष्यभर वा.ना. उत्पात यांनी अध्यापनाचे कार्य केले. ते कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक होते.

कै. वा.ना. उत्पात हे पंढरपूर अर्बन बँकेचे प्रदीर्घकाळ संचालक होते. तसेच त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांनी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली आहे. भागवत कथा सांगून यातून मिळालेल्या उत्पन्नातून सावरकर क्रांती मंदिराची भव्य वास्तू उभारली आहे . याच वाचनालयात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती करुन गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय केली होती. कै.वा.ना.उत्पात रुक्मिणी मातेचे पुजारी होते आणि उत्पात समाजाचे चेअरमन होते.

कोरोनाने पंढरपूरचे मोठे नुकसान केले असून यापूर्वी माजी आमदार सुधाकपंत परिचारक, राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील, ह.भ.प. रामदास महाराज जाधव (कैकाडी), भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्यानंतर वा ना उत्पात यांचेही निधन कोरोनाने झाले.