भाऊबीजेच्या दिवशीच पत्नी आणि मुलीला विष पाजून तरुणाने घेतला गळफास

0
1524

बीड, दि. ९ (पीसीबी) – भाऊबीजेच्या दिवशीच वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीला विष पाजून स्वत: ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुखद घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने आपल्याला काही लोक त्रास देत असल्याची उल्लेख असलेली चिठ्ठी लिहिली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी बीड जिल्ह्यातील संत नामदेवनगर येथून समोर आली आहे.

योगेश शिंदे पत्नी शीतल (वय २८) आणि मुलगी श्रावणीसह (वय ५) असे मयत एकाच कुटूंबातील तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी बीड जिल्ह्यातील संत नामदेवनगर येथे एकाच कुटूंबातील काही लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली असता तेथे योगेश याने घराच्या आवारातील एका झाडाला फाशी घेतली होती तर त्याची पत्नी शीतल आणि मुलगी श्रावणी हे देखील मयत अवस्थेत पडले होते. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात दरम्यान घरामध्ये एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये काही लोक आपल्याला त्रास देत असल्याच्या कारणावरुन आपन आत्महत्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रथम योगेश याने पत्नी आणि मुलीला विष पाजून मारले आणि मग स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, योगेश शिंदे हा खासगी वाहन चालक होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता अशी माहितीही समोर आली आहे. शिंदे कुटुंब पाच दिवसांपासून सासुरवाडीत राहत होते. गुरुवार रात्री तिघेही स्वगृही परतले होते. भाऊबीजेच्या दिवशीच योगेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. बीड पोलीस अधिक तपास करत आहेत.