भांडी निर्मिती करणाऱ्या कारखानदाराचाही चीनला दणका

0
242

 

मुंबई, दि. २८ (पीसीबी) चीनने अलीकडेच भारतीय सीमेवर केलेल्या आक्रमणाचा निषेध म्हणून भारातातील सर्वात मोठी भांडी निर्मिती क्षेत्रातील कंपनी टीटीके प्रेस्टिजनं चीनमधील आयात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आमची सध्याची ऑर्डर आल्यानंतर आम्ही चीनबरोबर असलेले सर्व व्यवहार संपुष्टात आणत आहोत, असे टीटीके प्रेस्टिज कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.’ त्यानुसार ३० सप्टेबर नंतर टीटीके प्रेस्टिज चीनकडून कोणतेही सामान आयात करणार नाही.

टीटीके प्रेस्टिज कंपनीचे अध्यक्ष टीटी जगन्नाथन याबाबत म्हणाले की, “चीनमधून आयात करत असेलेल्या वस्तू आम्ही तयार करू अथवा व्हिएतनाम किंवा तुर्कीसारख्या अन्य बाजारपेठेंकडून आयात करण्याचा विचार आहे. पाच वर्षांपूर्वी कंपनी एक तृतीयांश भाग किंवा वस्तू चीनकडून आयात करत होती. सध्या चीनकडून आयात करण्याचं प्रमाण फक्त दहा टक्के आहे. ”

पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या चकमकीत २० भारतीयांना हौतात्म्य आलं होतं. त्यानंतर भारत चीन दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला असून, सर्वच भारतीयांच्या मनात चीनविषयी तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. देशभरात चिनी वस्तुंचा बहिष्कार करण्याची मागणी होतेय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी Boycott Chinese Product अशी मोहिम राबवली आहे.

टीटीके प्रेस्टिज कंपनी काय आहे?

१९२८ साली टीटीके ग्रुपची स्थापना झाली. भारताचे माजी केंद्रीय वित्तमंत्री टी.टी. कृष्णम्माचारी यांची टीटीके कंपनी विविध उत्पादनांची निर्मिती करीत होती. अशा काळात स्त्रियांच्या स्वयंपाकघरातील दैनंदिन संघर्षांला सुकर करण्यासाठी ‘प्रेस्टिज’ या नावाने प्रेशर कुकरचा ब्रॅण्ड बाजारात आला. १९४०-५० च्या दशकात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केला जात असताना प्रेशर कुकरसारखी गोष्ट नवी होती. प्रेशर कुकरमध्ये पदार्थ शिजवणं कसं सुरक्षित आणि कमी वेळेचं आहे हे ग्राहकांना समजावून देण्यात प्रेस्टिज निश्चितच यशस्वी ठरलं आणि हा ब्रॅण्ड मोठा होत गेला. प्रेस्टिजने फक्त प्रेशर कुकरपुरतं मर्यादित न राहता जे विविध पर्याय उपलब्ध करून दिले त्यामुळे या प्रांतिक अडचणीवर मात करता आली. प्रेस्टिजने प्रेशर कुकरसोबत प्रेशर पॅन, प्रेशर हंडी, प्रेशर कढई अशी वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध करून दिली. प्रेशर कुकरसाठी प्रसिद्ध असलेला हा ब्रॅण्ड आज टोटल किचन सोल्युशन देत अनेकविध किचन उत्पादनांत विस्तारला आहे. भारतात दर ३० सेकंदाला प्रेस्टिजचं एखादं उत्पादन विकलं जातं ही माहिती कितपत खरी मानायची ठरवलं तरी किचनवेअरमध्ये हा ब्रॅण्ड भारतात अग्रगण्य नक्की आहे.