भल्या पहाटे गिरीश महाजन अजित पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण   

0
3872

नाशिक, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील टीकाटिप्पणीमुळे गेले काही दिवस राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच नाशिकच्या विश्रामगृहावर आज (गुरूवार)  भल्या पहाटे  गिरीश महाजन यांनी अजित पवारांची  भेट घेतली.  या  भेटीचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र, ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. 

अजित पवार आणि गिरीश महाजन हे दोघेही नेते एकाच वेळी शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. पहाटेच्या सुमारास गिरीश महाजन हे अचानक अजित पवार यांच्या कक्षेत गेले. गिरीश महाजन कक्षात आल्यानंतर अजित पवार यांनी देखील कार्यकर्त्यांपासून थोडसे बाजूला येत  महाजन यांच्याशी पाच मिनिटे  चर्चा केली. या दोघांत कोणती चर्चा झाली, हे मात्र समजू शकलेले नाही.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी बारामतीत येऊन निवडणुक जिंकवुन दाखवण्याचे खुले  आव्हान अजित पवार यांना दिले होते. त्यावर  बारामतीत या,  बारामती काय आहे ते दाखवतो,  असे आपल्या खास शैलीत अजित पवार यांनी महाजनांना  प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर नरमाईची भूमिका घेत आता वादाचे सोडा, राज्याच्या विकासावर बोलू, अशी भूमिका महाजनांनी घेत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.