भर दिवसा पोलीस ठाण्याजवळच पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला; तिघांना अटक

0
233

चिंचवड, दि.२७ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर बांबू आणि कोयत्याने मारून खुनी हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी दोन वाजता दवा बाजार, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

विकास गायकवाड (वय 23), अमोल गंगाराम सोनवणे (वय 22), शुभम अडागळे (वय 25) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांसह नितीन गवळी, अतिश सोनवणे, अजय थोरात, अभिजित सरोदे, अनुराग गवळी (सर्व रा. चिंचवड स्टेशन, चिंचवड) आणि त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरजा उर्फ सासराज राजू वाघमारे (वय 25, रा. थेरगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सुरजा आणि आरोपी यांची मागील काही दिवसांपासून भांडणे सुरु होती. त्यातूनच आरोपींनी आपसात संगनमत करून कोयता, लाकडी दांडके, वेळाचे बांबू, लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करत खुनी हल्ला केला. यात सुरजा गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

हा प्रकार पिंपरी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर घडला. मात्र, घटनास्थळ हे निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावत आहे.