‘भय इथे उरले नाही’; सिग्नल मोडून केली पोलीस उपनिरीक्षकालाच मारहाण

0
221

पिंपरी, दि.१० (पीसीबी) – रिक्षा चालकाने सिग्नल तोडला. त्यामुळे त्याला वाहतूक पोलिसांनी अडविले. त्यावेळी रिक्षा चालकाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केली. तसेच पोलीस नाईक आणि ट्राफिक वॉर्डनशी हुज्जत घालून शिवीगाळ करत पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. ही घंटा शनिवारी (दि. 9) दुपारी दोन वाजता देहूफाटा मोशी येथे घडली.

अक्षय बलभीम जाधव (वय 30, रा. महादेवनगर, चिखली) असे अटक केलेल्या रिक्ष चालकाचे नाव आहे. त्याच्यासह धीरेंद्र प्रताप सिंग (रा. देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय ठिगळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ठिगळे हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. शनिवारी सहाय्यक उपनिरीक्षक ठिगळे, पोलीस नाईक रोकडे आणि ट्राफिक वॉर्डन मोशी येथील देहूफाटा चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपी अक्षय याने सिग्नल बंद असताना सिग्नल तोडून रिक्षा (एमएच14/एचएम3972) भरधाव वेगात पुढे नेली. त्यामुळे ट्राफिक वॉर्डन तोडसम यांनी रिक्षा चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अक्षय याने ट्राफिक वॉर्डन सोबत हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केली. पोलीस नाईक रोकडे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर फिर्यादी सहाय्यक निरीक्षक ठिगळे यांना मारहाण केली. आरोपी अक्षयकडे असलेली दारूची बाटली फोडून त्याने स्वतःला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याला अडवत असताना सहाय्यक उपनिरीक्षक जखमी झाले. आरोपीने पोलिसांसोबत झटापट करून त्यांच्याशी वाद घालत मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.