भय्यू महाराजांना तोंड बंद ठेवण्यासाठी मंत्रिपदाची ऑफर होती – दिग्विजय सिंह

0
439

इंदूर, दि. १३ (पीसीबी) – भय्यू महाराज  शिवराज सिंह सरकारकडून मध्य प्रदेशातील नर्मदामध्ये करण्यात येणाऱ्या बेकायदा उत्खननामुळे चिंतीत होते. त्यामुळे तोंड बंद ठेवण्यासाठी त्यांना मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ऑफर नाकारली होती. याबाबत त्यांनी मला फोनवर बोलताना सांगितले होते, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी भय्यू महाराजांच्या आत्महत्येसाठी शिवराज सरकारला जबाबदार ठरवले आहे.  

भय्यू महाराज यांनी मंगळवारी (दि.१२ ) इंदूर येथे राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. ‘कोणीतरी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा. मी आता खचलोय. मी आता जात आहे’, असे त्यांनी लिहून ठेवले होते. माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी यामध्ये स्पष्ट  केले होते. दरम्यान, आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीचीही मागणी काँग्रेसने केली आहे.

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज (बुधवारी) दुपारी अडीच वाजता इंदूरमधील मेघदूत मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंत सुर्योद्य आश्रम येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. दुपारी १.३० वाजता अंतिम यात्रेला सुरुवात होणार आहे.