भगवानगडाला पंकजा मुंडेचे आव्हान; सावरगाव घाटात भव्य स्मारक उभारणार

0
798

बीड, दि. २५ (पीसीबी) – गणपती विसर्जनानंतर आता चाहूल लागली आहे, ती दसरा मेळाव्याची   मुंडे साहेबानी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवत संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या आशीर्वादाने त्यांच्याच जन्मस्थळी सावरगाव घाट येथे भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा १८ ऑक्टोबररोजी होणार आहे, अशी माहिती राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.  

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील भगवानगडावर दसरा मेळाव्यात समर्थकांना संबोधित करायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी चालू ठेवली आहे. मात्र, गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर यापुढे दसरा मेळावा होणार नाही. ही जागा राजकारणासाठी नाही, अशी भूमिका २०१६ मध्ये घेतली. त्यामुळे मोठा वाद होऊन मागील वर्षी पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा आयोजित केला होता.

 दरम्यान, भगवान गडाला  धार्मिक महत्त्व आहे. राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगडाची ओळख आहे. तसेच बीड जिल्ह्यात सर्वाधिक संख्येने असलेल्या ऊसतोडणी मजुरांचेही ते प्रमुख श्रद्धास्थान आहे. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.