Maharashtra

भंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे घर कोसळून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू

By PCB Author

August 21, 2018

भंडारा, दि. २१ (पीसीबी) – गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील राजेदाहे गावात घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकरू खंडाते (वय ३२), सारिका खंडाते (वय २८) आणि सुनक्याना खंडाते (वय ३) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. लोकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी शिरले आहे. येत्या २४ तासांत पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, भंडाऱ्यात १ जूनपासून ८५४ मिमी इतका पाऊस पडला आहे. गोसेखुर्द धरणाचे ३३ दारे एक मीटरने उघडण्यात आली आहेत. यातून २,४४,३०९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग जात आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.