ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांना कोरोना

498

विदेश, दि. 8(पीसीबी) : आतापर्यंत कोरोना विषाणूला गांभीर्याने न घेणारे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांना
कोरोनाची लागण झाली आहे. बोल्सोनारो हे आतापर्यंत गर्दीच्या ठिकाणी समर्थकांबरोबर फिरत होते आणि देश कोरोनाच्या विळख्यात सापडला असतानाही त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते.

राष्ट्राध्यक्षांनी मंगळवारी सांगितले की, माझी चौथी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी ठीक आहे. मी येथे फिरायलाही गेलो होतो पण वैद्यकीय कारणांमुळे मला फिरता आले नाही.
यापूर्वी त्यांनी त्यांची चाचणी झाल्याचे आणि एक्स-रेमध्ये फुफ्फुस व्यवस्थित कार्यरत असल्याचे सांगितले होते. मार्चमध्ये फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यापासून त्यांची 3 वेळा चाचणी घेण्यात आली होती. प्रत्येकवेळी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

बोल्सोनारो यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा विरोध केला आहे. त्यांनी त्यापेक्षा आर्थिक संकट आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला महत्त्व दिले. इतकेच काय तर त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन केले नाही. यामुळे त्यांना न्यायालयाने फटकारलेही होते.
देशासाठी राष्ट्राध्यक्षांना सार्वजनिक ठिकाणी जनतेमध्ये जाताना मास्क घालणे अनिवार्य आहे आणि त्यांनी जर असे केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकतो, असे न्यायाधीशांनी म्हटले होते.
ब्राझीलमध्ये आतापर्यंत 16 लाख 28 हजार 283 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेनंतर जगात सर्वाधिक रुग्णांची संख्या ही ब्राझीलमध्ये आहे. तिथे 65,631 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्याही अमेरिकेनंतर जगात सर्वाधिक आहे.