ब्राझीलचा विजय; नेमार विक्रमाच्या उंबरठ्यावर

0
388

रियो दि जानेरो, दि.१८(पीसीबी) : जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या नेमारच्या खेळाने ब्राझीलने कोपा अमेरिका स्पर्धेत आणखी एक विजय मिळविला. एकतर्फी झालेल्या सामन्यात त्यांनी पेरुचा ४-० असा धुव्वा उडवला.

या सामन्यातही गोल करत नेमारने ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल करण्याच्या शर्यतीत आज रोनाल्डोला मागे टाकले. या स्पर्धेत आपले पहिले दोन सामने जिंकणारा ब्राझील हा पहिला संघ ठरला असून, ते ब गटात अव्वल स्थानावर आले आहेत. या गटातील कोलंबिया आणि व्हेनेझुएला यांच्यातील दुसरा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.

गतविजेत्या ब्राझीलने पहिल्या सामन्यात व्हेनेझुएलाचा ३-० असा पराभव केल होता. प्रशिक्षक टिटे यांनी आज संघात फरक कडून ब्राझीलच्या आक्रमकतेत कुठेही फरक पडला नाही. त्यांनी आजही मोठा विजय मिळविला. ब्राझीलने आज एंडरसन, अॅलेक्स सॅंड्रो, थिएगो सिल्वा, एव्हर्टन आणि गॅब्रिएल बार्बोसा यांना संघात स्थान दिले. संघात मोठ्या प्रमाणावर बदल करून त्यांना खाते उघडायाला केवळ १२ मिनिटे पुरली. गॅब्रिएल जेसुसकडून आलेल्या पासवर अॅलेक्स सॅंड्रोने पहिला गोल केला. गेल्या कोपा स्पर्धेच्या अंतिम फेरीत या दोन संघाची गाठ पडली होती. तेव्हा ब्राझीलने त्यांच्या ३-१ असा पराभव केला होता. त्यावेळी त्यांनी जरा तरी प्रतिकार केला होता. या वेळी मात्र ते साफ निष्प्रभ ठरले.
ब्राझीलची कामगिरी

फॅबिनोने सांभाळलेली मधली फळी आणि नेहमी प्रमाणे आक्रमणात धोकादायक वाटणारा नेमार यांनी सामन्यावर ब्राझीलचे पूर्ण वर्चस्व निर्माण केले. दुसऱ्या सत्रात पंचांनी ब्राझीलला दिलेला पेनल्टीचा निर्णय वारची मदत घेतल्यावर रद्द ठरवला. पण, त्यानंतर लगेचच नेमारने मिळालेल्या संधीचे सोने करताना पेरुचा गोरक्षक पेड्रो गॅलेसेला चकवलेच. ब्राझीलच्या गेल्या चार सामन्यातील नेमारचा हा चौथा गोल ठरला. त्याचा ब्राझीलसाठी ६८वा गोल ठरला. त्याने नेमारला (६७) मागे टाकले. आता त्याच्या पुढे केवळ पेले असून, त्यांच्या नावावर ७७ गोल आहेत. त्यानंतर राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या एव्हर्टन रिबेरोने ब्राझीलची आघाडी वाढवताना ८९व्या मिनिटाला गोल केला. सामना संपताना १२ मिनिटे असताना पेरुच्या व्हॅलेरा याचा गोल करण्याचा प्रयत्न फसला. अगदी समोरुन त्याने हेडर केल्यावर चेंडू गोलपोस्टच्या अगदी जवळून बाहेर गेला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत ९३व्या मिनिटाला रिचार्लीसन याने ब्राझीलचा आणखी एक गोल केला.