बोपखेलकरांचा मोठा विजय; पूल व रस्त्याच्या जागेपोटी लष्कराला येरवड्यातील जागा देणार – आमदार लक्ष्मण जगताप

0
679

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – बोपखेल गावासाठी  मुळा नदीवर पूल आणि रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार एकर जागेच्या मोबदल्यात येरवडा येथील तेवढीच जागा लष्कराला देण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लष्करानेच येरवडा येथील सर्व्हे क्रमांक २०२/२ मधील चार एकर जागेची निवड केली आहे. या जागेचा सातबारा उतारा, आवश्यक नक्कल, मालमत्ता कार्डसह इतर सर्व कागदपत्रे देण्याचे पत्र तहसीलदारांना पाठविले आहे. त्यामुळे बोपखेलसाठी मुळा नदीवर पूल आणि कायमचा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. तसेच मुळा नदीवर पूल आणि रस्ता करण्याच्या कामाला तातडीने मंजुरी देण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीला सूचना केल्याचेही आमदार जगताप यांनी सांगितले. बोपखेलकरांनी हक्काच्या रस्त्यांसाठी अनेक वर्षांपासून केलेल्या संघर्षाचा आणि संयमाचा हा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका हिराबाई घुले आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलवासीय वर्षानुवर्षे दापोडी येथील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करत होते. परंतु, सीएमईने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने बोपखेलवासीयांना सध्या पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारून रस्ता करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची तरतूदही करण्यात आली. परंतु,  पूल आणि रस्त्यासाठी पुन्हा लष्कराच्याच चार एकर जागेचे संपादन करावे लागणार होते. महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर लष्कराने आधी चार एकर  जागेचा मोबदला मागितला. त्यानुसार जागेची मोजणी करण्यात आली. त्यानंतर बाजारभावानुसार या जागेपोटी लष्कराला २५ कोटी ८१ लाख रुपये देण्यास महापालिका राजी झाली.

मात्र नंतर लष्कराने जागेच्या मोबदल्यात जागेचीच मागणी केली. लष्कराची जागेची मागणी राज्य सरकारच्या पातळीवर पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भाजपच्या स्थानिक ज्येष्ठ नगरसेविका हिराबाई घुले, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. सुरूवातीला मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर देखील महसूलचे अधिकारी हलले नाहीत. परंतु, आमदार जगताप यांच्या सततच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री फडवणवीस यांनी कडक शब्दांत समज दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी लष्कराला जागेच्या मोबदल्यात जागा देण्याची कार्यवाही सुरू केली. बोपखेलच्या रस्त्यासाठी जागा घेण्याच्या मोबदल्यात पुणे किंवा पिंपरी-चिंचवडमधील सरकारची तेवढीच जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जागांची पाहणी करण्यात आली. त्याचा अहवाल पुणे जिल्हाधिकारी आणि लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. त्यानुसार लष्कराने येरवडा येथील सर्व्हे क्रमांक २०२/२ मधील जागेला पसंती दिली आहे. या जागेचा सातबारा उतारा, आवश्यक नक्कल, मालमत्ता कार्डसह इतर सर्व कागदपत्रे देण्याबाबत मेजर अर्शदिप सिंग यांनी तहसीलदार तृप्ती कोलते यांना पत्र पाठविले आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी येरवडा येथील संबंधित जागा लष्कराला देण्याची प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. आता मुळा नदीवर पूल उभारणे आणि त्यापुढे रस्ता करण्याच्या निविदेला पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची लवकरात लवकर मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्याबाबत स्थायी समितीला सूचनाही करण्यात आल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

बोपखेलकरांच्या रस्त्याचा वनवास संपावा यासाठी भाजपच्या स्थानिक नगरसेविका हिराबाई घुले आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामार्फत राज्य सरकार आणि दिल्ली दरबारी संरक्षण मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. या दोघांनीही दिल्लीत अनेकदा तळ ठोकून मोदी सरकारमधील आतापर्यंतच्या सर्व संरक्षण मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकांमध्ये बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्न कायमची सोडवण्याची मागणी लावून धरली होती. या दोघांचा राज्य सरकारकडेही सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला अखेर यश आल्याने नगरसेविका हिराबाई घुले आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी समाधान व्यक्त केले आहे. हा बोपखेलकरांच्या संघर्षाचा आणि संयमाचा विजय असल्याची प्रतिक्रिया या दोघांनीही दिली आहे. बोपखेल गावासाठी कायमचा रस्ता व्हावा म्हणून भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील आपली राजकीय ताकद पणाला लावली होती. उशीरा का होईना हा प्रश्न सुटल्याने माझ्या बोपखेलकरांना आनंद झाल्याचे चेतन घुले यांनी सांगितले.