बोट बुडून ३२ लोकांना जलसमाधी

0
370

ढाका, दि. ३० (पीसीबी) – बांगलादेशात ढाका येथे बुरीगंगा नदीत शंभर प्रवाशांनी खच्चून भरलेली बोट दुसऱ्या बोटीच्या धडकेनंतर बुडाली. त्यात ३२ जणांना जलसमाधी मिळाली असून इतर अनेकजण बेपत्ता आहेत. बांगलादेश आंतरजल वाहतूक प्राधिकरणाने सांगितले की, चालकांच्या निष्काळजीमुळे हा अपघात घडला आहे. यावेळी मदत कार्य करणाऱ्यांच्या मते अनेकजण बोटीत अडकून पडले आहेत. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता ही बोट बुडाली असून त्यात शंभर प्रवासी होते.

जुन्या ढाक्यात श्यामबझार भागात बुरीगंगा नदी आहे. आतापर्यंत ३२ मृतदेह सापडले असून बेपत्ता प्रवाशांचा शोध चालू आहे. वृत्त वाहिन्यांच्या माहितीनुसार पाच महिला व दोन मुले यांची ओळख पटली आहे. ‘मॉर्निग बर्ड’ नावाची बोट मुन्शीगंज येथून ढाक्याला येत असताना बुडाली. त्या बोटीला मोयूर २ या दुसऱ्या बोटीने सदरघाट थांब्याजवळ धडक दिली होती. या अपघातानंतर मोयूर बोटीचा चालक व इतर कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला व लपून बसले. मोयूर २ बोटीवर एक हजार प्रवासी होते.

नौदल व तटरक्षक दल तसेच अग्निशामक दलाने मदतकार्य सुरू केले आहे. एक मदत नौकाही पाठवण्यात आली असून त्याच्या मदतीने मॉर्निग बर्ड ही बोट बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. मोयूर -२ बोटीने धडक दिल्यानंतर ही छोटी बोट लगेच बुडाली. किनाऱ्यावर असलेले लोक मदतीला आले पण तोपर्यंत बरीच हानी झाली होती. किती लोक पोहून बाहेर पडले हे समजले नाही. सगळीकडे चिखलाचे पाणी असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.