Desh

बोगस वेबसाईट बनवून राम मंदिराच्या नावाखाली उकळले लाखो रुपये

By PCB Author

June 22, 2021

उत्तरप्रदेश, दि. 22 (पीसीबी) : अयोध्येतील राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच बनावट वेबसाईट तयार करून देणगीच्या नावाखाली रामभक्तांकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने बेकायदेशीर वेबसाईट तयार करून पैसे उकळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या या नावाने अवैधपणे वेबसाईट सुरू करून लोकांकडून देणगीच्या नावाखाली पैसे उकळणे सुरू असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली. राम मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करणाऱ्यांना सोमवारी अटक करण्यात आली. नोएडा सायबर पोलीस ठाणे आणि लखनौ सायबर क्राईम मुख्यालयातील पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने वेबसाईट सुरू केली होती. ही वेबसाईट बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आली होती. राम मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक स्वरुपात योगदान देऊ इच्छिणाऱ्यांसाठी बँकेचा खाते क्रमांक देण्यात आलेला होता. त्याचबरोबर इतरही माहिती होती, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

आरोपींनी बोगस वेबसाईटच्या माध्यमातून आणि राम मंदिराच्या नावाखाली देणगीदारांकडून लाखो रुपये उकळले. त्यांनी भाविकांचा विश्वासघातच केलेला नाही, तर बनावट वेबसाईट बनवण्याचे बेकायदेशीर कृत्यही केलं आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांची ओळख पटवण्यात आली आहे. आशिष गुप्ता (वय २१), नवीन कुमार सिंग (वय २६), सुमित कुमार (वय २२), अमित झा (वय २४) आणि सुरज गुप्ता (वय २२) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाच जणांपैकी तीन जण अमेठी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत, तर दोघे बिहारमधील सीतामढी येथील आहेत. पाचही जण सध्या नोएडाला लागून असलेल्या पूर्व दिल्लीतील न्यू अशोक नगर परिसरात राहत होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून पाच मोबाईल जप्त केले. त्याचबरोबर एक लॅपटॉप आणि आधार कार्डच्या ५० प्रतीसह अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे.