Pimpri

बोअरवेलच्या ट्रकचे स्टेपनी ब्रॅकेट निसटून पडले अंगावर…कामगाराचा जागीच मृत्यू

By PCB Author

December 30, 2020

पिंपरी, दि. 30 (पीसीबी) : बोअरवेलच्या ट्रकचे चाक फसल्याने जॅक लावताना स्टेपनी ब्रॅकेट निसटून अंगावर पडल्याने ट्रॅकवर काम करणा-या एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 28) दुपारी सव्वापाच वाजता पिंपळे निलख येथे घडली.

सनीलाल संतुलाल वाडिया (रा. पिंपळे निलख. मूळ रा. मध्य प्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत सुरेश राजकुमार मरावी (वय 20, रा. पिंपळे निलख. मूळ रा. मध्य प्रदेश) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बोअरवेल ट्रक चालक प्रेमसुख भागचंद वरखडे (रा. पिंपळे निलख. मूळ रा. मध्यप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश, मयत सनीलाल, आरोपी प्रेमसुख हे बोअरवेलच्या ट्रकवर काम करतात. पिंपळे निलख येथून जात असताना एका ठिकाणी ट्रकचे चाक खचले. त्यामुळे ट्रक चालक प्रेमसुख याने सनीलाल याला ट्रेकला जॅक लावण्यास सांगितले. ट्रकच्या खालील जागा भुसभुशीत होती, तसेच तिथे पाण्याची टाकी फुटली होती. त्यामुळे जॅक लावत असताना ट्रकचे स्टेपनी ब्रॅकेट निसटले आणि सनीलाल याच्या पाठीवर पडले. त्यात सनीलाल गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.