“बैल कितीही आठमुठा असला तरी, शेतकरी….” : संजय राऊतांचा मोदींना चिमटा

0
222

मुंबई, दि.२० (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा शुक्रवारी केली. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून केंद्राच्या निर्णयाचं स्वागत होतं असलं तरी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली जातेय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. राऊत यांनी एक ट्वीट करत पंतप्रधान मोदींना जोरदार टोला लगावलाय. संजय राऊत यांनी म्हंटल आहे कि, ‘बैल कितीही आठमुठा असला तरी, शेतकरी आपलं शेत नांगरतोच. जय जवान, जय किसान’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यासोबतच राऊत यांनी एक ट्विट करत पंतप्रधान मोदींनी मृत्युमुखी पडलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी. तसंच लाल किल्ला हिंसाचारासह शेतकऱ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला होता. पंतप्रधानांनी सात वर्षात पहिल्यांदा देशातील जनतेचा आवाज ऐकला. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली. दिल्लीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. एक वर्षापूर्वीच ऐकलं असतं तर अनेकांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

गेल्या दीड वर्षापासून देशातील शेतकरी विशेषतः पंजाब, हरियाणाचा शेतकरी तीन कृषी कायदे, काळे कायदे याविरुद्ध संघर्ष करतोय, आंदोलन करतोय. सरकारची भूमिका पहिल्यापासून आठमुठेपणाची होती. काही झालं तरी झुकणार नाही, काही झालं तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं. या संपूर्ण काळात 450 च्या आसापास शेतकऱ्यांचे मृत्यू झाले, आत्महत्या झाल्या. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आलं. लाठ्याकाठ्या वापरण्यात आल्या. प्रचंड दबावाचं राजकारण करण्यात आलं. शेतकऱ्यांना आतंकवादी, पाकिस्तानी, खलिस्तानी अशा प्रकारच्या उपमा देण्यात आल्या. पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती इतकी परखड आणि अतिशय स्पष्ट होती की देशातील शेतकऱ्यांच्या भावनाही शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिल्या आणि अखेर आज पंतप्रधानांना तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले, असंही राऊत म्हणाले.