बैठकीत ही महत्वाची चर्चा झाली…

0
267

मुंबई, दि. १० (पीसीबी) : आघाडीत पारनेरची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अशा कुठल्याही घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कोरोनासोबत इतर विकास कामांबाबतही यावेळी चर्चा झाली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (9 जुलै) शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि इतर मंत्रीदेखील ‘वर्षा’ बंगल्यावर उपस्थित होते. तर इतर मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजर होते.

या बैठकीनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला. या बैठकीला पालकमंत्रीदेखील उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी काय उपाययोजना करात येतील, याबाबत चर्चा झाली”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीत कोरोनासोबतच इतर विकासाच्या प्रकल्पांबाबतही चर्चा झाली, असंदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान, या बैठकीत पारनेरबाबत काही चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला असता, “पारनेरचे पाचही नगरसेवक पुन्हा शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे तो विषय संपला आहे. आघाडीत अशा कुठल्याही घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची ठाणे जिल्ह्यातील महापालिका आयुक्तांसोबत बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (9 जुलै) ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्तांची व्हीसीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विविध महापालिका क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आयुक्तांना महत्वाच्या सूचना दिल्या. “ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका, आपापल्या शहरांतील नागरिकांना , स्वयंसेवी संस्थाना यात सहभागी करुन घ्या, जेणेकरुन या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल”, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली