Bhosari

बेशिस्त नागरिकांमुळेच पुन्हा लॉकडाऊन वेळ सतत मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा, साबणाने हात धुवा – महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आवाहन

By PCB Author

July 10, 2020

 

 

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – आजवर पिंपरी चिंचवड शहरा केव्हाच कोरोन मुक्त झाले असते, पण लॉकडाऊन खुला केल्या पासून काही बेशिस्त नागरिकांनी अगदी कहर केला आणि त्यांच्या मुळेच पुन्हा त्यांच्यामुळेच पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन ओढावला आहे. दरम्यान, या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज फेसबूक लाईव्ह केले. त्यात त्यांनी अगदी कळकळीचे आवाहन करताना पुन्हा पुन्हा सांगितले की, घराबाहेर असताना सतत मास्कचा वापर करा, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखा, वारंवार हात साबणाने धुवा असे आवाहन नागरिकांना केले. लॉकडाऊन सर्वांनी खूप गांभीर्याने पाळावा, आजवर केले तसेच सहकार्य प्रशासनाला करा, असे ते म्हणाले.

फेसबूक लाईव्ह मध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोना आपल्यातून गेलेला नाही, आपल्या बरोबर आहे. जोवर लस येत नाही तोवर कोरोनाची संगत करायची आहे. त्यासाठी बाहेर जाताना मास्क वापरा, कुठेही असला तरी दुसऱ्याशी बोलताना अंतर ठेवा आणि सॅनिटायझर बाळगा. प्रत्यक्षात वेळोवेळी सांगूनही लोक मास्क वापरत नाहीत. जे वापरतात ते तोंडावर न घेता हनुवटीवर ओढून ठेवतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होतो. त्यावर एकच उपाय म्हणजे मास्कचा वापर १०० टक्के लोकांनी करणे.जून अखेरीपर्यंत शहरात ३००० रुग्ण होते आज १० जूनला ६००० म्हणजे जवळपास दुप्पट रुग्ण झालेत. चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र, मास्क सर्रास वापरला तर त्यावर आपण सहज मात करू शकतो.

समाधानाची बाब म्हणजे ३५०० रुग्ण बरे होऊन आपपाल्या घरी गेलेत. ते प्रमाण ६० टक्के आहे ज्यांनी कोरोनाला पळवून लावले. फक्त ४० (२५००) टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी ८० टक्के म्हणजे १८०० ते १९०० रुग्णाना कुठलीही लक्षणे नाहीत. बाकीच्या २० टक्के रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, खोकला, जुलाब असे त्रास होतात. म्हणजेच फक्त ५-१० टक्के कोरोना रुग्णांमध्येच गंभीर लक्षणे आढळतात. ज्यांना काही दुर्धर आजार आहेत त्यांना काळजी घ्यावी लागते. ताप, खोकला अशी लक्षणे दिसली तर ती अंगावर काढू नका, डॉक्टरांना दाखवा. कोरोना टेस्ट करा आणि पॉझिटिव्ह आढळली तरी घाबरून जाऊ नका. कित्तेक जेष्टांना कोरोना झाला आणि ते ठणठणीत बरे झाले आहेत. खबरदारी घेणे प्रत्येकाच्या हातात आहे. मे मध्ये अनलॉक सुरू केला तेव्हा विविध गोष्टी खुल्या केल्या आणि त्यानंतरच कोरोनाचा प्रसार वाढला आहे, असे स्पष्ट करून ही कोरोनाची चैन खंडित करायची असेल तर आता पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे. त्यासाठीच हा निर्णय घेतला आहे असे सांगून नागरिकांनी पहिल्यासारखेच सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले.