बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव – मुख्यमंत्री कुमारस्वामी

0
461

बेंगळुरू, दि. १ (पीसीबी) – बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा तसेच काही सरकारी आस्थापने बेळगावला हलवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. बेळगावचे बेलगावी असे नामकरण करण्यात आलेले आहे. तसेच या भागातील विकासाला चालना देण्यासाठी मी २००६ मध्ये मुख्यमंत्री झालो तेव्हापासून बेलगावीला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. परंतु आता हा प्रस्ताव  अमलात आणण्यासाठी आम्ही  विचार करत आहोत, असे  कुमारस्वामी यांनी सांगितले.   

किरकोळ कामासाठी कलबुर्गी,  धारवाड, हुबळी येथील लोकांना बेंगळूरला जावे लागत आहे. त्यासाठी बेलगावीमध्ये काही सरकारी खाती सुरू करण्याचा आपला विचार आहे. उत्तर कर्नाटकच्या १३ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र राज्याची मागणी करण्यात येत आहे, असे कुमारस्वामी म्हणाले.

दरम्यान, महाजन आयोगाच्या अहवालाचा आधार घेत बेळगाव धारवाडसारखी अनेक मराठीबहुल शहरे कर्नाटकमध्ये सामील करण्यात आली. त्यावरून गेली अनेक दशके हा वाद  धुमसत आहे. आता उत्तर कर्नाटकातील १३ जिल्ह्यांनी स्वतंत्र राज्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे  कुमारस्वामी सरकारसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळेच बेलगावीला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देऊन हा वाद शांत करण्याचा  कुमारस्वामी यांचा प्रयत्न आहे.