Pimpri

बेघर कुटुंबास निवारा देवून भोसरीतील डॉ. चिंदे दांपत्य ठरले खरे देवदूत

By PCB Author

June 16, 2020

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) :- कोरोना महामारीमध्ये घर मालकाने भाडेकरुंना बाहेर काढल्यानंतर हडपसर परिसरातील रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली राहणाऱ्या शिंदे कुटुंबाला भोसरीच्या डॉ. चिंदे दांपत्याने मोफत निवारा देवून ते खरे देवदूत ठरले.

भोसरीतील आई रुग्णालयाचे संचालक प्रसूतीतज्ञ डॉ.सचिन चिंदे व डॉ. मंजुश्री चिंदे असे बेघर शिंदे कुटुंबासाठी देवदूत बनलेल्या दांपत्याचे नाव आहे. सोमवार (दि.१५) रोजी सकाळी एका वृत्तवाहिनीवर बातमी झळकली.दोन महिन्यापासून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली एका लहान बाळासह राहणारे या शिंदे कुटुंबीयांचे अतोनात होणारे हाल पाहून मन हेलावले. डॉ. सचिन चिंदे यांनी तातडीने त्या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात फोन करून वरिष्ठांसोबत चर्चा केली. बेघर कुटुंबाला आम्ही निवारा देवू इच्छितो असे या चर्चेदरम्यान डॉ चिंदे यांनी भावना व्यक्त केली. वृत्तवाहिनीच्या कार्यालयातून अनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव तुम्हाला संपर्क करतील” असे सांगण्यात आले.

डॉ चिंदे यांना काही तासांतच नंदिनी जाधव यांचा फोन आला.कोरोनाच्या काळात घरभाडे द्यायला पैसे नसल्याने घरमालकाने शिंदे कुटुंब रस्त्यावर आल्याचे निदर्शनास आले. कोरोनाच्या भीतीमुळे या कुटुंबास कुणीही निवारा द्यायला तयार नव्हते. बांधकाम मजूर असलेले शिंदे कुटुंबात लहान बाळासह २ महिला, ३ पुरुष आहे. झाडाखाली वास्तव्यास असलेल्या या कुटुंबास हडपसर परिसरातून काळेवाडीत आणण्यात आले. नंतर काळेवाडीतील डॉ चिंदे यांनी आपल्या इमारतीमधील एका खोलीत राहण्याची मोफत सोय करून दिली. निवाऱ्यासह त्या कुटुंबास २/३ महिने पुरेल इतके मोफत अन्नधान्य देण्यात आले. एका घरमालकाने भाडे दिले नाही म्हणून घराबाहेर काढले तर दुसऱ्या डॉक्टर घरमालकाने मोफत निवारा देवून माणुसकीचे दर्शन घडवले. पावसामुळे या निष्पाप व निरागस बाळ आजारी पडले असते.आम्ही दोघेही स्वतः स्त्रीरोग तज्ञ असल्याने आम्हाला जाणीव असल्याचे डॉ चिंदे यांनी सांगितले.