बेकायदेशीररित्या दारु पुरवणाऱ्या तिघांना चाकणमधून अटक; दोन वाहनांसह पावनेचार लाखांच्या दारुच्या बाटल्या जप्त

0
1173

चाकण, दि. ११ (पीसीबी) – हॉटेल चालकांना बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या पुरवाणाऱ्या तिघा आरोपींना ३ लाख ७० हजार रूपये किमतीच्या दारूच्या बाटल्या आणि दोन वाहनांसह अटक करण्यात आली आहे.  ही कारवाई पिंपरी-चिंचवड शहर गुन्हे शाखेच्या पथकाने चाकण-तळेगाव चौकात शुक्रवारी (दि.९) दुपारी केली.

घनशाम दिसू यादव (वय २४, नागेश्वर विद्यालयाजवळ, मोशी), चंद्रकांत भिमराव ओव्हाळ (वय २५, रा. खंडोबा माळ, चाकण) आणि विजय शिवनाथ सातव (वय ४०, रा. चिंबळी, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी बोलेरो पिकअप आणि टाटा सुमो या दोन वाहनांमधून बेकायदेशीररित्या चाकण ते लोणावळ्यापर्यंत ढाब्यावर देशी-विदेशी दारू विक्री करिता घेऊन जाणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखा युनिटच्या एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलीसांच्या पथकाने चाकण-तळेगाव चौकात सापळा रचला आणि दोन्ही वाहनांची तपासणी केली. त्यावेळी दोन्ही वाहनांमध्ये ३ लाख ७० हजार रूपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या आणि बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी दोन्ही वाहनांसह दारुच्या आणि बिअरच्या बाटल्या असा एकूण ११ लाख ७० हजार रूपये किमतीचा ऐवज जप्त केला. आणि तिघा आरोपींना अटक केली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, फौजदार चामले, किशोर यादव, प्रमोद लांडे, महेंद्र तातळे, स्वप्निल शिंदे यांच्या पथकाने केली.