Maharashtra

बुलढाण्यातील ‘त्या’ घटनेमुळे राज्याची लक्तरे वेशीवर – अशोक चव्हाण

By PCB Author

June 23, 2018

नांदेड, दि. २३ (पीसीबी) – पीक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी करणारी घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. अशा घटना म्हणजे राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे, अशी  प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणारी घटना घडली होती. याप्रकरणी दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यांविरुध्द ग्रामीण पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर अशोक चव्हाण म्हणाले की, ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. अशा घटना राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार असुन, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट  माझा हे सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

पीक विम्याची रक्क्म वाटपात सरकार पक्षपातीपणा करत आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात जास्त रक्क्म वाटप होते. तर विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघात तूट्पुंजी रक्क्म दिली जात आहे. काही मतदारसंघात पाच लाख तर काही मतदार संघात रुपयाही दिलेला नाही, असे चव्हाण म्हणाले.