Desh

बुऱ्हाणपूरचा ‘ताजमहाल’ पहिलात का? बायकोवरच्या प्रेमासाठी पठ्ठ्याने तब्बल 50 एकरात बांधला ‘ताजमहाल’

By PCB Author

December 02, 2021

बुऱ्हाणपूर, दि.०२ (पीसीबी) : नवऱ्यानं आपल्याला बायकोला गिफ्ट देण्यात काही नवं नाही. अगदी घरातल्या वस्तू, मोबाईल कॉम्प्युटर, फॉरिन ट्रिपपासून घर, गाड्यांपर्यंत भेटी दिलेल्या आपण ऐकलं आहे. पाहिलं आहे. या भेट देण्यामध्ये स्पर्धाही असते. मैत्रिणीला तिच्या नवऱ्यानं अमकी भेट दिलीय, तशीच भेट तुम्हीही मला द्या असा आग्रह घराघरात असतो. बायकोचा वाढदिवस, दिवाळी पाडवा, लग्नाचा वाढदिवस हे तर भेट मिळवायचे हक्काचे दिवस असतात. पण मध्यप्रदेशातल्या एका व्यावसायिकानं भारतातल्या सगळ्या नवऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे. त्यांनी आपल्या पत्नीसाठी थेट ताजमहालच बांधला आहे. 21 व्या शतकातल्या या शहाजहान बादशहाचं नाव आनंद प्रकाश चोकसी असून त्यांच्या मुमताजचं नाव मंजुषा आहे.

हे घडलंय मध्य प्रदेशातल्या मुघल वारसा लाभलेल्या शहरातच ते म्हणजे बुऱ्हाणपूरमध्ये. आनंद प्रकाश 52 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या लग्नाला 27 वर्षं झाली आहेत.  जेव्हा शाहजहानसमोर दारा शिकोहचं मुंडकं कापून आणलं गेलं… बाबर जेव्हा उर्दू बाजारातल्या एका मुलाच्या प्रेमात पडला होता…आनंद यांनी हे ‘प्रेमाचं प्रतिक’ थेट बुऱ्हाणपुरातच आणून ठेवल्यामुळे ते हे फक्त बायकोला दिलेलं गिफ्ट समजत नाहीत. बीबीसी न्यूजशी बोलताना ते म्हणाले, “हे मी फक्त बायकोला दिलेलं गिफ्ट नसून पूर्ण शहराला आणि शहरात राहाणाऱ्या लोकांना दिलेलं गिफ्ट आहे.”

ताजमहालासारख्या दिसणाऱ्या या घरासाठी त्यांना 2 कोटी रुपये खर्च आला आहे. चोकसी यांचा ताजमहाल त्यांच्या 50 एकरांच्या जागेत बांधण्यात आला आहे. त्या जागेत एक रुग्णालयही आहे. आता हे घर पाहायला लोक गर्दी करत आहेत. या घरासमोरच्या जागेत लोक फिरायला येतात, फोटो काढतात. अनेक लोकांनी प्री वेडिंग शूटलाही सुरुवात केल्याचं चोकसी सांगतात. ते सांगतात, “मी त्यांना थांबवत नाही. कारण आमच्या शहरात सर्वजण एकमेकांना ओळखतात. माझं घर सर्वांसाठी खुलं आहे.” अर्थात सर्वच लोकांना घर आतून पाहायची संधी मिळत नाही. कारण चोकसी म्हणतात, “अहो शेवटी ते आमचं घर आहे, आम्ही तिथे राहातो.”

या घरात दोन बेडरुम्स आहेत. या दोन्ही बेडरुम्स वेगवेगळ्या मजल्यांवर आहेत. एक लायब्ररी आणि ध्यानगृहसुद्धा आहे. बैठकीच्या खोलीत संगमरवराचा वापर केला असून गोलाकार जिनेही आहेत. या घराची मूळ कल्पना ताजमहालावर बेतलेली असली तरी घराचं सगळं काम इस्लामी स्थापत्यासारखं नाहीये असं चोकसी सांगतात. त्यात काही समकालीन बदलांचा प्रभावही दिसतो. त्यामुळेच घरात आधुनिक सोफे आणि पडदे आहेत. हे घर बांधायला त्यांना तीन वर्षं लागली आणि ताजमहालाचा अभ्यास करायला अनेक आग्रावाऱ्या कराव्या लागल्या.

चोकसी म्हणतात, आम्ही इंटरनेटवरील थ्रीडी फोटोंचाही अभ्यास केला. हे घर म्हणजे फक्त मी बायकोला दिलेलं गिफ्ट नाही असं ते सांगतात. “आज आपल्या देशात द्वेष वाढला आहे. लोक धर्म आणि जातींमध्ये विभागले गेले आहेत. अशा काळात मला यामधून प्रेमभावना पसरवायची आहे. हे घर प्रेमाचं प्रतीक आहे. सामाजिक आणि राजकीय कोलाहलापलिकडे ते जाणारं आहे.”