चिखली पोलीस ठाण्याचे पालकमंत्री बापट यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन

0
789

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या चिखली पोलीस ठाण्याचे उद्घाटन निश्चित करण्यात आले असून येत्या बुधवारी (दि.१०) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त मकरंद रानाडे यांनी तसे संकेत देखील दिले असून १०० कर्मचारी आणि दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नव्याने सुरु होणाऱ्या चिखली पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्यात निगडी, सांगवी, चिंचवड पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षातून एकूण १०० कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. त्यामध्ये ५ सहाय्यक फौजदार, २८ पोलीस हवालदार, २८ पोलीस नाईक, ४ महिला पोलीस नाईक, १९ पोलीस शिपाई, १६ महिला पोलीस शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चिखली पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे येत्या बुधवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते चिखली पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.