बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा यांची नियुक्ती

0
175

नवी दिल्ली,दि.२५(पीसीबी) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा यांची नियुक्ती केली. त्याचवेळेस अॅबी कुरुविला आण देबाशिष मोहंती यांची निवड समिती सदस्य म्हणून निवड केली.

माजी कसोटीपटू चेतन शर्मा हे सध्याचे अध्यक्ष सुनील जोशी यांची जागा घेतील. जोशी यांची या वर्षी फेब्रुवारीमध्येच अध्यक्ष म्हणून वर्णी लागली होती. अर्थात ते हरविंदर सिंग यांच्यासह निवड समिती सदस्य म्हणून कायम राहणार आहेत. पाच जणांची निवड समिती पूर्ण करताना क्रिकेट सल्लागार समितीने चेतन शर्मा, अॅबी कुरुविला, देबाशिष मोहंती यांची निवड केली.

क्रिकेट सल्लागार समितीला निवड समितीचा अध्यक्ष निवडताना चेतन शर्मा आणि अजित आगरकर यांच्यापैकी एकाची निवड करायची होती. मदनलाल, आर.पी. सिंग आणि सुलक्षणा नाईक यांच्या सल्लागार समितीने चेतन शर्माच्या पारड्यात आपले मत टाकले. चेतन शर्मा उत्तर विभागाचे प्रतिनिधीत्व करतील. त्याचवेळी सल्लागार समितीने मोहंती यांना बढती दिली. मोहंती सध्या कुमार गटाचे अध्यक्ष होते. कुमार गटाची त्यांची जागा रणदेव बोस घेईल.