Maharashtra

बीडमध्ये शरद पवारांचे मुक्कामाचे ठिकाण बदलले; तर्कवितर्कांना उधाण   

By PCB Author

September 27, 2018

बीड, दि. २७ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संकल्प मेळाव्यासाठी बीडच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते बीडमध्ये  मुक्काम करणार आहेत. त्यांच्या राहण्याचे ठिकाण निश्चित केले होते. दरम्यान अचानकपणे त्यांच्या  राहण्याच्या ठिकाणामध्ये बदल केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

सोमवारी (दि.१) राष्ट्रवादीचा विजयी संकल्प मेळावा  बीडमध्ये आयोजित केला आहे. त्यासाठी  शरद पवार रविवारी (दि.३०)  बीडमध्ये दाखल होणार आहेत. ते राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्र निवासस्थानी मुक्काम करणार होते. मात्र, अचानक मुक्कामाचे ठिकाण बदलण्यात आले. आता ते धैर्यशील सोळंके यांच्या रत्न-सुंदर बंगल्यावर मुक्काम करणार आहेत. त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, पवारांच्या मुक्कामाचे ठिकाण बदलण्यास आगामी लोकसभा निवडणुकीची किनार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभेचे संभाव्य उमेदवार बदलणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.