बीएमसीने नेस्को कोव्हीड सेंटरच्या कामात किती कोटींचा घोटाळा, वाचा…

0
255

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मुंबई महापालिकेबाबत एक घोटाळा भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी उघड केला आहे. १० कोटी ८० लाखाच्या या कामात तब्बल ६ कोटींचा गफला असल्याचा त्यांचा आरोप आहे. एका बिल्डरला डेकोरेटर आणि मेडिकल सप्लायचे काम थेट पध्दतीने दिले असल्याचा आरोप आहे. हे काम देताना त्याचा आधीचा अनुभव न पाहता हे काम दिले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

महानगरपालिकाला नेस्को कोव्हीड सेंटर साठी 10 कोटी 80 लाखाची वर्क ऑर्डर काढायची होती तर त्यासाठी टेंडर का काढलं गेलं नाही ? जर एवढा वेळ नव्हता तर मग बीएमसीच्या ठरलेल्या दरात किंवा मार्केट रेटचा विचार न करता हे काम या बिल्डरला कसे दिले गेले असे प्रश्न आमदार मिहीर कोटेचा यांनी महापालिकेला विचारले आहेत.

काम तीन महिन्यासाठी रोमेल ग्रुपला देण्यात आले असून त्यामागे साधारण 6 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असल्याचा त्यांचा आरोप आहे. मे ते जुलै २०२० नंतर आता हे काम याच बिल्डरला पुढील 3 महिन्यासाठी याच वर्कऑर्डर नुसार देण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास 12 कोटी रुपयांचा घोटाळा यामागे होऊ शकतो, असा संशय आमदार मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केला आहे.

ज्या वस्तू नेस्को कोव्हीड सेंटरमध्ये या बिल्डरकडून घेण्यात आल्या आहेत, अशा एकूण 23 वस्तूच्या खर्चाबाबात आमदार कोटेचा यांनी माहिती काढली. किती मोठा भ्रष्टाचार या वर्क  ऑर्डर मागे झाला आहे ते यातून सिध्द होते, असा दावा त्यांनी केला आहे.  याबाबत आयुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी, आमदार कोटेचा यांनी केली आहे. आम्ही करत असून लोकायुक्तकडे सुद्धा या प्रकरणी लक्ष घालण्याचे मागणी करणार आहोत.